चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 7 जून : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) की इंडिया आघाडीचे सरकार येणार, हा मुद्दा उपस्थित झाला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएच्या घटक पक्षातील नेत्यांची बैठकी पार पडल्या आणि या बैठकीत एनडीएतील घटक पक्षातील नेत्यांनी एकमताने घेतलेल्या निर्णयामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, त्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ याबाबत माहिती समोर आली आहे.
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी केव्हा होणार? –
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असून रविवार, 9 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. यानंतर जोशी यांनी शपथविधी संदर्भात माहिती दिली.
मोदींची नेतेपदी निवड –
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. एनडीएने बहुमत असल्याचे दाखवत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना एनडीएचे नेतृत्व म्हणून निवडण्यासाठी एनडीएच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते यांची उपस्थिती आहेत.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview