जळगाव, 11 जून : जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटना ताज्या असताना जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिषाखाली एका अभियंत्याची 26 लाखांत फसवणूक करण्यात आली आहे. चेतन विनायक नेहेते असे या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे राजोरे येथील रहिवासी असलेले चेतन नेहेते हे बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत अभियंता (मेंटेनन्स इंजिनिअर) आहेत. 10 मार्च ते 6 जून यादरम्यान दोन जणांनी त्यांच्याशी संपर्क साधून व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्रामला जॉईन होण्यास सांगितले आणि त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवून पोर्टलवर नोंदणी करायला लावली. दरम्यान, त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा विश्वास संपादन करत ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ, असे आमिष दाखविले.
जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल –
अज्ञातांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या बँक खात्यावर 26 लाख 74 हजार रुपये स्वीकारले. दरम्यान, चेतन नेहेते यांना कुठलाही परतावा न मिळाल्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, नेहेते यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : चोरीला गेलेल्या तीन मोटारसायकली भडगाव पोलिसांनी केल्या हस्तगत, काय आहे संपुर्ण बातमी?