जळगाव, 9 जुलै : हवामान विभागाने राज्यात आज देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकण, पालघर ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात रेड तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट –
राज्यात काल मुसळधार पाऊस झाल्यानंतर भारतीय हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्टचा इशारा दिलाय. राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
खान्देशसह संपुर्ण राज्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला असून खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबारात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलीय. तसेच जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने 80 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लागवड कापसाची करण्यात आली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत आज सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी –
हवामान विभागाने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना आज मंगळवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा