जळगाव, 15 जुलै : महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. दरम्यान, आज देखील राज्यच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिला अलर्ट –
हवामान विभागाकडून आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत मध्यम तर काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आलीय.
खान्देशात जोरदार पाऊस –
खान्देशात पावसाने गेल्या आठवडा भरापासून जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. दरम्यान, काल खान्देशातील विविध भागात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जळगाव जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात रावेर व पारोळा तालुका सोडल्यास इतर सर्वच तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच चोपडा तालुक्यातील अडावद व धानोरा या दोन्ही महसूल मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पावसाची नोंद झाली आहे.
जळगावचे हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि पारोळा तालुका सोडल्यास सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, काल रात्री जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आजही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : Rain Update : बळीराजा सुखावला! राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी