मुंबई, 23 जुलै : महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. आज देखील कोकणात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना रेड तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज वर्तविला आहे. आज रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जळगावचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात शेती कामांना वेग आला असताना गेल्या आठवड्यापासून समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. काल, जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून आज आणि उद्या मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचे –
विदर्भात पुढील पाच दिवस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 23 जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
हेही वाचा : Modi 3.0 : एनडीए सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार, मोठ्या घोषणा होण्याची शक्यता