पाचोरा, 9 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लोहारी याठिकाणी अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनाच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी राज्य सरकार हे सामान्य लोकांसाठी आहे. शेतकरी, वारकरी, शिक्षक, विद्यार्थी, माता भगिनी सर्वांच्या सन्मानासाठी आहे, असे सांगितले.
यावेळी काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी शब्द देताना विचार करतो. मात्र, शब्द मी फिरवत नाही, अशी माझी पद्धत आहे. म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 लोकांनी विश्वास ठेवला. लोक विश्वास ठेवतात. बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यासोबत महाराष्ट्राबाहेर काम केलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय.
आम्ही काही राजकीय पार्श्वभूमी घेऊन आलेलो नाहीत. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का, मला शेतकऱ्यांच्या बद्दल फार जिव्हाळा आहे, फार प्रेम आहे. या राज्यातला शेतकरी हा आपला बळीराजा आहे. हा अन्नदाता आहे. शेतकरी आपल्याला दोन घास देतो, मेहनत करतो. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत. शेवटी हे सरकार कुणासाठी आहे. तर हे सरकार सामान्य लोकांसाठी आहे.
हेही वाचा – पाचोऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला, काय आहे कारण?
हे सरकार शेतकरी, वारकरी, शिक्षक, विद्यार्थी, माता भगिनी सर्वांच्या सन्मानासाठी आहे. आम्ही जेव्हापासून या राज्यात सरकार स्थापन केले, सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंच मंत्रिमंडळात होतो. परंतु आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा समाजाच्या हिताचा होता. शेतकऱ्यांच्या हिताचा होता. म्हणून अल्पावधित हे सरकार लोकप्रिय होतंय, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील आणि इतर राजकीय नेते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.