सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 3 ऑगस्ट : परिस्थितीची जाणीव करून लक्ष निर्धारित करत त्याला प्राप्त करण्यासाठी मेहनतीने केलेले प्रयत्न हे एकेदिवशी यशोशिखरावर पोहचवल्याशिवाय राहत नाही. पारोळ्याच्या प्रफुल कैलास कोकंदेने हे सिद्ध करून दाखवलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रफुलची पीएसआयपदी निवड झालीय. यानिमित्त सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने प्रफुलसोबत विशेष संवाद साधला. यावेळी मिळालेल्या यशाबद्दल त्याने भावना व्यक्त केल्या.
प्रफुलची पीएसआयपदी निवड –
महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पारोळा येथील प्रफुल कैलास कोकंदे या तरूणाची पोलीस निरीक्षक पदासाठी (PSI) निवड झाली आहे. प्रफुलने स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना प्रयत्नांमधील सातत्य आणि मेहनतीने हे यश मिळवत राज्यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 च्या पीएसआय पदासाठी ओपन कॅटेगिरीतून 120 वी रँकने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवलाय.
11 महिन्यांचा असताना वडिलांचं निधन अन्…
प्रफुल मुळचा पारोळा शहरातील रहिवासी असून तो अवघ्या 11 महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, बालपणीच वडिलांचे पित्रुछत्र हरपल्यानंतर प्रफुलचा मामांनी सांभाळ केला. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेत धुळ्याला शिक्षणासाठी दाखल केले. दरम्यान, प्रफुलचे 10 वी आणि 12 वीचे शिक्षण हे धुळ्याला झाले.
मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालंय पदवीपर्यंतचे शिक्षण –
धुळ्यातील जे आर सी टी हायस्कूलमधून शिक्षण पुर्ण करत असताना प्रफुलने दहावीला 80 टक्के तर विज्ञान शाखेतून बारावीला 63 टक्के मिळवले. दरम्यान, बारावीपासूनच स्पर्धा परिक्षांचा विचार मनात असताना त्याने मॅकेनिकल इंजिनिअरिंग करण्याचे ठरवले. यानंतर जळगावातील एसएसबीटी महाविद्यालयातून 2019 साली मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.
स्पर्धा परिक्षेच्या तयारीला सुरूवात –
प्रफुलने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर एका चांगल्या कंपनीत नोकरी करावी, अशी सर्वसाधारण अपेक्षा त्याच्या कुटुंबाला होती. मात्र, प्रफुलने कुटुंबाकडे वेळ मागत मोठ्या आत्मविश्वासाने स्पर्धा परिक्षा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने कुठेही पुणे-मुंबईला न जाता पारोळ्यातच राहून पुर्ण वेळ स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. दरम्यान, प्रफुलने MPSC Combine देण्याचं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचे नियोजन करत अंमलबजावणी केली.
पीएसआयपदी निवड झाल्यापर्यंतचा प्रवास –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या कंबाईनच्या परिक्षेतील पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश मिळाले. मात्र, पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाची तयारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2022 साठी निघालेल्या जाहिरातनुसार त्याने MPSC Combine ची पुर्व परिक्षा दिली. यामध्ये त्याला 100 पैकी 58 मार्क्स मिळाले. यानंतर मुख्य परिक्षेत 400 पैकी 305.5 तर मुलाखतीत 40 पैकी 26 मार्क्स मिळाले. दरम्यान, प्रफुलने मुख्य परिक्षा व मुलाखतीत एकूण 440 पैकी 331.5 मार्क्स मिळवत राज्यातून ओपन कॅटेगिरीतून 120 वी रँक प्राप्त केली. यामुळे त्याची पीएसआयपदी निवड झाली.
…अन् ती सुवर्णसंधी ठरली –
प्रफुलची पुर्व परिक्षा ही 8 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. यानंतर तो मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरला. मात्र, जवळपास एक वर्षानंतर अर्थात 1 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य परिक्षा पार पडली. याबाबत प्रफुलने सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले की, पुर्व परिक्षेनंतर मुख्य परिक्षेदरम्यानचा कालवधी हा माझ्यासाठी सुवर्णकाळ ठरला. या एकवर्षाच्या प्रतिक्षा काळाचा मी पुरेपुर उपयोग हा माझ्या अभ्यासासाठी दिला. मला मिळालेल्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग मुख्य परिक्षेच्या अभ्यासाठी करणे ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती अन् तिचा मी फायदा घेतला.
पीएसआयपदी निवड झाल्यानंतरच्या भावना –
सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना प्रफुलने मिळालेल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, पीएसआय पदी निवड झाल्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करण्यासारखा नाहीये. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येत असताना जसे ध्येय डोळ्यासमोर होते, ते ध्येय आज साक्षात पुर्णत्वास आल्यानंतर अविश्वनीय होतं. माझी पीएसआयपदी निवड झाली, हे स्वप्न तर नाही ना? असे वाटत होते. जी भूक होती, ती यशाने पुर्ण झाल्यासारखे वाटत होते.
माझ्या या यशात माझे मामा तसेच कुटुंबियांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करत पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ दिली. दरम्यान, पुणे-मुंबई याठिकाणी न जाता मी पारोळ्यातच राहून 10 ते 12 तास अभ्यास केला. यामध्ये पारोळ्यात असलेल्या नगरपालिकेच्या वाचनालयात देखील जास्तीत जास्त वेळ अभ्यास केला असल्याचे देखील प्रफुलने सांगितले.
तरूणाईला दिला मोलाचा सल्ला –
प्रफुलने तरूणाईला मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना शिस्त असणे गरजेचे आहे. अभ्यास करत असताना कितीही अडचणी येत असल्या तरी ‘मी आणि माझा अभ्यास’ हाच ध्यास डोळ्यापुढे ठेवत त्या अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना आपण नेमकी कोणती परिक्षा देणार आहोत, हे ठरवून अभ्यास करण्याचा देखील कालावधी ठरवला पाहिजे. यानुसार नियोजन करून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशीच्या एका तासासाठी लढा, असेही त्याने सांगितले. दरम्यान, प्रफुलची पीएसआय पदी निवड झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत