चाळीसगाव, 18 ऑगस्ट : चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेडमधील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. रोशनी सुभाषसिंग आर्य (वय 9 वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय 8 वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय 3 वर्ष) व आराध्या सुभाषसिंग आर्य (वय 4 वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) अशी चारही मृत मुलांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी म्हणून येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे आले असताना त्यांच्या परिवारात 5 मुली, 1 मुलगा आहेत. त्यांच्या परिवारातील मोठी मुलगी ही कपडे धुण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती. बहिणी सोबत जावे म्हणून रोशनी सुभाषसिंग आर्य, शिवांजली सुभाषसिंग आर्य, आर्यन सुभाषसिंग आर्य व आराध्या सुभाषसिंग आर्य ही चारही बहिण-भावंडे आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सोबत गेली.
पाय घसरला अन् 4 बहीणभावांचा बुडून मृत्यू –
बहिण कपडे धुत असताना ही चारही मुले धरणाच्या पाण्याजवळ गेले. मात्र, त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाल्याची ही ह्रदयकद्रावक घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांना याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळलाय.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत