चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून नेपाळमधील पशुपतिनाथ येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांची बस 500 फूट उंचावरुन नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 27 भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह काल जळगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द करत रवाना करण्यात आले. या प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगावात लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, तसेच अनेक केंद्रीय राज्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘एक दु:खद घटना याठिकाणी घडली. काठमांडू जाताना येथील 25 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमचे सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. तसेच राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथील कार्यक्रमात केली.
नेपाळ बस अपघात दुर्घटना –
नेपाळमधील पशुपतीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस तनहू जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळल्याने 27 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहू रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव तळवेल, गाळेगाव मधील आहेत. यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनच्यावतीने दिल्ली तसेच नेपाळ सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यात आला. याबाबतची माहिती त्याठिकाणाहून घेण्यात आली होती. दरम्यान, काल 25 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले.
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला कठोर इशारा, म्हणाले..
नार पार गिरणा प्रकल्प : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?