पाचोरा, 12 जानेवारी : जिल्ह्यातील अनेक तरुण आज भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आहेत. तसेच अनेक जण परराज्यातही सेवा बजावत आहेत. यातच एक नाव म्हणजे पाचोरा तालुक्याचे सुपूत्र आयएएस अधिकारी मनोज महाजन. मनोज महाजन हे सध्या ओडिशा राज्यात सेवा बजावत आहेत. संपूर्ण तरुणाईला प्रेरणा मिळेल, असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आज राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, आयएएस मनोज महाजन यांचा यशस्वी प्रवास.
नुकतीच मिळाली पदोन्नती –
मराठी मातीत जन्माला आलेले खान्देशच्या पाचोरा तालुक्याचे सुपूत्र मनोज महाजन हे सध्या ओडिशा राज्यात सेवा बजावत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना पदोन्नती मिळाली असून ते सध्या ओडिशातीलच सुंदरगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी/मुख्य विकास अधिकारी पदी सेवा बजावत आहेत. याआधी ते एसडीएम पदावर कार्यरत होते.
पाचोरा तालुक्यातील रहिवासी –
मनोज महाजन हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांच्यामध्ये आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. त्यांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण पाचोरा तालुक्यातील गाळणच्या आश्रमशाळेत झाले. त्यांना दहावीत 91 टक्के गुण तर जळगाव येथील एम. जे. कॉलेजमध्ये बारावीत 92 टक्के मिळाले. तसेच यानंतर सीईटी परीक्षेत त्यांनी 176 गुण मिळवले. यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून पदवी मिळवली.
मनोज महाजन यांनी 2017 मध्ये यूपीएससी परीक्षा पास होत 903 रँक मिळवली होती. मात्र, त्यांना आयएएस सेवा मिळाली नव्हती. म्हणून त्यांनी पुन्हा आणखी जोमाने अभ्यास केला आणि 2019 मध्ये यूपीएससी परिक्षेत 125 वी रँक मिळवली. तसेच आयएएस सेवेला गवसणी घातली.
आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करायचे त्यांनी ठरवले होते. त्यातूनच देशासह आपल्या गावाचे नाव मोठे करण्यासाठी मनोज यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यासाठी पुणे येथील चाणक्य मंडळात अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली यूपीएससी परीक्षेची तयारी केली. आपल्या या यशाचे खरे गुरू व मार्गदर्शक माझे आई-वडिलच आहेत, असे ते सांगतात.
IAS मनोज महाजन यांचा तरुणाईला मोलाचा सल्ला
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास जिद्द, चिकाटी, परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धा परीक्षेत यशस्वीतेसाठी हिम्मत खचू देऊ नका. आत्मविश्वास, सोशिकता ठेवा, एकत्र अभ्यास करा, चांगले मित्र-मैत्रिणी यांची संगत धरा. विचारांची देवाण-घेवाण करा. छत्रपती व्हा. संधीचे सोने करा. ध्येय निश्चित करा, असा सल्ला ते स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तसेच तरुणांना देतात. त्यांचा हा जीवनप्रवास आजच्या तरुणाईला निश्चितच प्रेरणादायी आहे.