जळगाव, 2 सप्टेंबर : हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर कालपासून जळगाव जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झालाय. सध्यास्थितीत ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळतेय. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने हतनूर, वाघूर तसेच गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
वाघूर नदीला पूर –
वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 02 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदतकार्याची गती वाढविणेबाबत सूचना केल्या. पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
गिरणा, हतनूर धरणाची परिस्थिती –
गिरणा धरणातील 02 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 2,442 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून 99,941 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दरम्यान, नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तैनात –
जळगाव जिल्ह्यातील विविध नदीपात्रांवर नागरिकांची सुरक्षा व मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक मागविणते आले आहेत. त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करणेत येत आहे. यामध्ये वाघूर नदीकाठावर पहूर ता जामनेर, तापी वाघूर संगम साकेगाव ता. भुसावळ, तापी नदीकाठावर चांगदेव ता. मुक्ताईनगर असे 03 पथके तैनात करण्यात आलेली आहेत.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन –
तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जावु नये तसेच पशुधन ही नेऊ नये. आपतकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस –
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडतोय. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.
हेही वाचा : राज्यात आजपासून मुसळधार पाऊस, या भागात ‘रेड अलर्ट’, जळगाव जिल्ह्याचा असा आहे हवामान अंदाज