पुणे, 26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन करण्यात करण्यात येणार आहे. दरम्यान, हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडणार आहे. मात्र, पुण्यात कालपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात –
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येत असून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. तसेच सोलापूर विमानतळाचा लोकार्पण सोहळा यांसह वेगवेगळ्या खात्यांचा 12 प्रकल्पांची सुरूवात मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता ए.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट –
पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वत्र ओले झाले असून ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कालपासूनच पंतप्रधान मोदींची सभा पार पडू शकणार की नाही याबाबत साशंकता होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात पावसाचा इशारा –
पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview