जळगाव, 28 मार्च : राज्य सरकारच्यावतीने अंमालबजावणी केल्या जात असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रेंटिस तत्वावर भरती करून घेत प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
नेमकी बातमी काय? –
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी आधार नोंदणी (Aadhar Validation) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित आस्थापनांनी त्यांच्या प्रशिक्षणार्थींची आधार नोंद CMYKPY पोर्टलवर करावी, अन्यथा विद्यावेतन देता येणार नाही, अशी माहिती सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संदीप गायकवाड यांनी दिली.
11 एप्रिलपर्यंत आधार नोंदणी बंधनकारक –
ही नोंदणी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या INTERN LOGIN मध्ये 11 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करावी लागेल. या योजनेंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने निश्चित करण्यात आला असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवार संबंधित आस्थापनात रुजू झाल्यास पाच महिन्यांचा अतिरिक्त कालावधी कार्यप्रशिक्षणासाठी अनुज्ञेय राहील.
…अन्यथा विद्यावेतन मिळणार नाही –
संबंधित आस्थापनांनी त्यांच्या नवीन व सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची आधार नोंदणी वेळेत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 11 एप्रिल 2025 पूर्वी आधार नोंदणी न केल्यास प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन मिळणार नाही, याची संबंधित आस्थापनांनी नोंद घ्यावी.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना –
महायुती सरकारच्यावतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरूवात करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रेंटिस तत्वावर भरती करून घेत प्रशिक्षण दिले जाते. आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, आयटीआय आणि पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.