चुंचाळे (यावल), 17 फेब्रुवारी : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामपंचायतीत लाचखोरीचे प्रकरण समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात लाच लुचपत विभागाच्या पथकाने ग्रामसेवक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डीटीपी ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे. तर ग्रामसेवक पसार झाले आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी ? –
चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, यावल तालुक्यातील चुंचाळे या गावात त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता.
मंजूर निधीतून तब्बल 50 टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी रोजी लाचलुचपत विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, लाचलुचपत विभागाने सापळा रचत ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले. डीटीपी सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने अटक केली तर ग्रामसेवक हेमंत जोशी हे पसार झाले. दरम्यान,दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीच्या पथकाने केली कारवाई –
पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ना. बाळू मराठे, सुनिल वानखेडे, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा : भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, ट्रकने दुचाकी नेली 12 किमी फरफटत, जामनेरच्या दोघांचा मृत्यू