जळगाव, 1 ऑगस्ट : जळगाव-पाचोरा रोडवरील वावडदे आणि वडील दरम्यान लक्झरी व डंपरमध्ये अपघात झाल्याची घटना आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे. दरम्यान, वावडदा व वडली येथील नागरिकांनी अपघातस्थळी वेळीच धाव घेतल्याने जखमींना मदत करत रूग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
नेमकं काय घडलं? –
जळगाव-पाचोरा रोडवर खासगी लक्झरी नेहमी वापरत असतात. तसेच या रोडवर डंपर देखील वापरत असतात. वावडदेनजीक असलेल्या हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेताजवळ नागमोडी वळण आहे. याठिकाणी पाचोऱ्याकडून जळगावकडे जाणारी लक्झरी क्रमांक (एम एच 19 वाय 3359) आणि वावडद्याकडून पाचोऱ्याकडे येणारी एल एच पाटील कन्स्ट्रक्शनची डंपर क्रमांक (एम एच 19 सी एक्स 2577) यामध्ये आज सकाळी साडेदहा वाजता जोरदार अपघात झाला. दरम्यान, या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत.
डंपरची लक्झरीला धडकली –
डंपरचालक संजय पुंडलिक महाजन (वय 38, रा. नांद्रा ता. पाचोरा), सिंधूबाई एकनाथ पाटील (वय 50), सरूबाई विठ्ठल केळकर (वय 55) यांच्यासह काहींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रूग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, लक्झरी व डंपरमध्ये झालेला हा अपघात इतका मोठा होता की, यात दूरपर्यंत आवाज जावून लक्झरी एका बाजूने चिरफाडली गेली. यात लक्झरी चालक- वाहक व प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
गंभीर जखमी रूग्णालयात केले दाखल –
दरम्यान, वावडदा व वडली येथील नागरिकांनी अपघातस्थळी वेळीच धाव घेतल्याने जखमींना मदत केली. तसेच गंभीर जखमी झालेल्यांना रूग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी जळगावात रुग्णालयात दाखल केले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जमा झाली असताना रस्ता मोकळा करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह मदतीसाठी हजर झालेल्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
वळणावर सूचना फलकच नाही –
नांदगाव-पाचोरा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून ज्या वळणावर अपघात झाला त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नसल्याची तक्रार यावेळी उपस्थित नागरिकांनी केली. दरम्यान, आजपर्यंत या ठिकाणी सूचनाफलक लावले गेले नसल्याने वारंवार अपघात होत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुढील काही दिवसात संबंधित प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी याठिकाणी सूचना फलक लावावेत अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात आजपासून पाऊस सक्रिय होणार, जळगाव जिल्ह्यातील आजचा ‘असा’ आहे हवामान अंदाज