चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता सरकार कोण स्थापन करणार, याची उत्सुकता देशाला लागली आहे. तर भाजपला जरी स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण भाजपसह मित्र पक्षांच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मित्र पक्षांचे महत्त्व वाढले आहे. काल एनडीएची बैठकही झाली. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांचे विशेष महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच त्यांनी आता भाजपसमोर मोठी मागणी ठेवली आहे.
अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा –
मोदी सरकारने अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने मागणी केली आहे. केंद्रात तयार होत असलेल्या नवीन सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे. मोदी सरकारने अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे सदस्य नीतीश कुमार आग्रही आहेत. या योजनेसंदर्भात बिहार, उत्तरप्रदेश तसेच भारतातील इतर राज्यांमध्येही प्रचंड रोष आहे. अग्निवीर योजनेसंदर्भात मतदारांमध्ये निराशा आहे. आमच्या पक्षाची अशी इच्छा आहे की, सविस्तरपणे त्यातल्या कमतरता दूर केल्या जाव्यात. जनतेने जे आक्षेप नोंदवले आहेत, ते सोडवले जावेत, अशी माहिती जेडीयू पक्षाचे नेते के. सी. त्यागी यांनी आज माध्यमांना दिली.
दरम्यान, आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात जेडीयूची ही महत्त्वाची मागणी पूर्ण करणार का, अग्निवीर योजनेवर पुनर्विचार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे अग्नीवीर योजना –
अग्निवीर योजनेत निवड झालेल्या जवानांना रुजू झाल्यावरच 30 हजार रुपये पगार मिळेल. पण यातून सरकार पगाराच्या 30 टक्के रक्कम कापून अग्निवीरांच्या नावाने सर्व्हिस फंड या फंडात जमा करणार आहे. म्हणजेच अग्निवीरला पहिल्या वर्षी 21 हजार रुपये प्रत्येक महिन्याला रोख रक्कम हातात मिळेल. हा नियम संपूर्ण वर्षासाठी लागू होतील. विशेष म्हणजे सरकार जेवढा पैसा अग्निवीरच्या पगारातून कापते तेवढेच पैसे ते त्या सर्व्हिस फंडात जमा करणार आहे. अग्निवीरांचा दुसऱ्या वर्षीचा ढोबळ पगार 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार असेल. 30 टक्के रक्कम कट केल्यानंतर उरलेले पैसे त्याच्या हातात येतील. अग्निवीरांची नोकरी 4 वर्षांसाठी असेल. मात्र सैन्यदलातील जवान किमान 15 वर्षे काम करतात तरच त्यांना पेन्शन आणि निवृत्तीच्या सुविधा मिळण्याचा हक्क आहे. त्यामुळे 4 वर्षानंतर अग्नीवीर जवान नेमके काय करणार, असाही प्रश्न अनेकांना आहे. अग्निवीरांना वर्षभरात फक्त 30 सुट्ट्या दिल्या जातील. तसेच त्यांना गरजेनुसार वैद्यकीय रजा दिली जाईल. तर दुसरीकडे सैन्यदलाच्या नियमित सेवेत सेवा बजावणाऱ्यांना वर्षाला 90 सुट्ट्या मिळतात. या सर्व नियमांमुळे तरुणाईमध्ये अग्नीवीर योजनेबाबत प्रचंड रोष आहे.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview