मुंबई : पाचोऱ्याचे सुपूत्र आणि अहिराणी बोली भाषेचे अभ्यासक डॉ. रमेश सुर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अहिराणी बोली भाषेचे अभ्यासक डॉ. रमेश सुर्यवंशी यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार डॉ.मनीषा कायंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील दिग्गज, नामवंत साहित्यिक, लेखक, प्रेक्षक उपस्थित होते.
डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीतून संशोधन करून, अत्यंत महत्त्वाची ग्रंथसंपदा निर्माण करण्यासोबतच अहिराणी शब्दकोश, अहिराणी म्हणी आणि वाक्प्रचार, तसेच खान्देशातील कृषी जीवनावर सचित्र ग्रंथ तयार केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा- अभ्यासक पुरस्कार 2024 (व्यक्ती) जाहीर झाला. यानंतर गुरुवारी मराठी भाषा गौरव दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे त्यांना सन्मानित करण्यात आले. दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठीतच बोललं पाहिजे –
मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक जगभरात पसरलेले आहेत. परंतु काही मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदी, इंग्रजीत बोलतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे मराठीतच बोललं पाहिजे. जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवले पाहिजे, वाढवले पाहिजे, जोपासले पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
डॉ. रमेश सूर्यवंशी हे मूळ पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण इंग्रजी विषयात एम.ए., बी.एड. असून ते पीएच.डी. धारक आहेत. यासोबतच त्यांनी कन्नड येथील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल 34 वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. डॉ. सूर्यवंशी यांचे अहिराणी भाषा-वैज्ञानिक अभ्यास, अहिराणी बोली म्हणी वाक्प्रचार, अहिराणी शब्दकोश ही पुस्तके सन 1997 मध्ये प्रकाशित झाली आहेत. ‘प्रांजल’ ही मराठी कादंबरी वर्ष 1999 मध्ये आली. तर यानंतर खान्देशातील कृषक जीवन सचित्र कोश वर्ष 2002 मध्ये प्रकाशित झाला.