मुंबई, 23 डिसेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टींची सर्वात जास्त चर्चा होती, अखेर तो क्षण आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र कधी येणार, शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार का, ती कधी होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता उद्या महाराष्ट्राला मिळणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर याबाबतची घोषणा केली. जुलै महिन्यात मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या कौटुंबिक भेटीगाठी वाढल्याचेही दिसून आले. मात्र, या दोन्ही पक्षांची युती झाली नव्हती. तसे राज ठाकरेंनी युतीबाबत बोलू नये, असे आदेशही आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अखेर तो क्षण आला आहे. महाराष्ट्रातील मोठा एक वर्ग आहे, ज्यांना असं वाटतं की ठाकरे बंधू एकत्र यावेत आणि उद्या आता अखेर अधिकृतरित्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.

पुढच्या महिन्यात महापालिका निवडणूक –
दरम्यान, राज्यात पुढच्या महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या शिवसेनेच्या आणि मनसेच्या युतीकडे सर्वांकडे लक्ष लागलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेची सत्ता ही उद्धव ठाकरेंकडे आहे. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करुन मुंबई महापालिकेची निवडणुक लढवणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे मनसे-ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही युतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या मदतीने पुन्हा मुंबई महापालिकेची सत्ता मिळवतात की भाजप-शिंदेसेना या मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






