अहमदनगर, 4 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांची लाच स्विकारल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या दोघा अभियंत्यांविरुध्द तब्बल 1 कोटी रुपये लाच स्विकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहायक अभियंता (वर्ग 2) अमित किशोर गायकवाड (32, रा. प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर, नगर, मुळ रा. चिंचोली ता. राहुरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ही रक्कम स्वतःसाठी तसेच एमआयडीसीचे नगरमधील तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्याकरीता स्वीकारली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या पथकाने केली कारवाई –
या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक) आणि पो.ना.प्रभाकर गवळी, पो. ना. संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो .ना. सुरेश चव्हाण, सर्व नेमणूक (ला.प्र.वि. नाशिक) यांनी नगर शहराजवळ सापळा रचत ही कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने काल, शुक्रवारी ही कारवाई केली. महाराष्ट्रामध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची लाच स्विकारल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,अहमदनगरच्या औद्योगिक वसाहती मध्ये 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31,57,11,995/- रुपयाचे रकमेचे 5 टक्के प्रमाणे अनामत रक्कम 1,57,85,995/- रुपये तसेच सदर कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94,71,500/- रुपये झालेल्या कामाचे अंतिम देयक 14,41,749/- रुपये असे एकूण 2,66,99,244/- रुपये तक्रारदार यांना मिळावे, म्हणुन बिलावर गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर गणेश वाघ यांचा सह्या घेऊन सदर देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात अमित गायकवाड यांनी स्वतः साठी आणि गणेश वाघ यांचेकरीता तक्रारदार यांचे सदर कामाचे बिलाचे व यापूर्वी अदा केलेली काही बिलांची बक्षीस म्हणून 1,00,00,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. काल ही 1 कोटी रुपयांची लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन –
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक दुरध्वनी क्रमांक – 02532578230, टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.