अमरावती, 27 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. तर दुसरीकडे राज्यातील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापैकीच एक म्हणजे अचलपूर मतदारसंघातून पराभूत झालेले आमदार बच्चू कडू. भाजपचे प्रविण तायडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर त्यांनी भाष्य केले आहे.
बच्चू कडू काय म्हणाले? –
बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे भाजप सत्तेत आले. त्यांनी बंड केले नसते तर भाजप सत्तेत आले नसते. आणि सत्तेत आले नसते तर भाजपचा हा प्रयोग यशस्वी झाला नसता. यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय हे शिंदे साहेबांना जाते. खरंतर, त्यांनी बंडखोरी केली नसती तर तुम्हाला मागील अडीच वर्षांपासूनची सत्ता मिळाली नसती. आणि सत्ता मिळाली नसती तर लाडकी बहिण योजनाही आणता आणली नसती.
दरम्यान, तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्यामुळे लाडकी बहिण भेटली आणि लाडकी बहिण भेटल्यामुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत यायला लागले. दरम्यान, ज्यांनी तुम्हाला लाडकी बहिण योजना आणून दिली त्या लाडक्या भावाकडे तुम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू यांचा पराभव –
विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे प्रविण तायडे यांन त्यांचा पराभव केला. यामध्ये प्रविण तायडे यांना 78 हजार 201 तर बच्चू कडू यांना 66 हजार 070 इतकी मते मिळाली. दरम्यान, अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा आमदार राहिलेले बच्चू कडू यांचा 12 हजार 131 मतांनी पराभव झाला.
हेही वाचा : एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस… मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणाची?; चार दिवस उलटले तरी तिढा कायम