छत्रपती संभाजीनगर, 25 जानेवारी : ईव्हीएम मशिन हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. यामध्ये हवे तसे घोटाळे करण्याला वाव आहे. जगात भारत सोडून सर्वच देशांनी ईव्हीएमवर बंदी घातली आहे. भारतातही निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आगामी निवडणूक मतदान पत्रिकांवर – बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी केली आहे.
भारतीय दलित पँथरच्या वतीने निदर्शने –
भारतीय दलित पँथरच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम बंदी आण बॅलेट पेपेरवर मतदानासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी भारतीय दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. रमेशभाई खंडागळे बोलत होते. यावेळी प्रा. धांडे यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी –
अॅड. रमेशभाई खंडागळे म्हणाले की, ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळे होतात. ते एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, त्यामुळे त्याला हॅक करणे, किंवा त्यामध्ये छेडछाड करुन घोटाळे करणे शक्य आहे. त्यामुळे ईव्हीएमवर बंदी घालून यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा द्यावा –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याची मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने करण्यात आली. विद्यापीठाला केंद्रीय दर्जा मिळाला तर शहर हे देशाच्या नकाशावर येईल आणि शिक्षणासंबंधीचे विविध कोर्सेस या शहरात येतील, शहराचा विकास होईल. त्यासोबत मराठवाड्यातील तरुण-तरुणींना शिक्षणासाठी बाहेर राज्यात जाण्याची गरज राहाणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन –
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावाने केंद्रीय विद्यापीठ आहे, त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देऊन, देशात नावलौकीक होईल असे हे विद्यापीठ करण्याची मागणी पँथरने केली. दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा, बेघरांना घरे आणि मराठवाड्यात वाढलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात पँथरने आंदोलन करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.