महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 18 सप्टेंबर : भडगाव आणि पारोळा तालुक्यात दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला गाळण येथून भडगाव पोलिसांनी काल 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अटक केली. दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी सदर आरोपीकडून 5 चोरीच्या मोटार सायकल जप्त केल्या. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उमेश बबन पाटील रा.गाळण असे आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील तळवण तांडा येथील नाना राठोड यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. दरम्यान, संशयित आरोपी उमेश बबन पाटील (रा. गाळण ता. पाचोरा) याने ही दुचाकी चोरी केली असल्याची गोपनीय माहिती सहायक फौजदार हिरालाल पाटील यांना मिळाली.
भडगाव पोलिसांची कारवाई –
भडगाव पोलिसांनी काल, रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता कारवाई करत दुचाकी चोर उमेश पाटील याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने भडगाव आणि पारोळा तालुक्यातून चोरी केलेल्या एकूण 5 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगा परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील, निलेश ब्राह्मणकर, सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, कुंदन राजपूत यांनी केली आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत