चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव (मुंबई), 8 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत जे मतदारसंघ महायुतीत भाजप तसेच मित्र पक्षाच्या वाटेला आली आहेत आणि त्याच मतदारसंघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. अशा 40 उमेदवारांवर भाजपने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असताना माजी खासदार हिना गावीत, ए टी पाटील यांच्यासह अमोल शिंदे यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यांनी स्वतःहून पक्षाचा राजीनामा दिल्याने भाजपने या तिघांचा राजीनामा मंजूर केला आहे.
भाजपने तिघांचे राजीनामे केले मंजूर –
अक्कलकुवा हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनाला मिळाल्याने दोन वेळा भाजपचे खासदार राहिलेल्या हिना गावीत यांनी याठिकाणी बंडखोरी केली. तर दुसरीकडे जळगाव लोकसभेचे दोन वेळा खासदार राहिलेले भाजपचे ए टी पाटील यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत आहेत. तसेच पाचोऱ्यातून भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, हिना गावीत, ए टी पाटील यांच्यासह अमोल शिंदे यांनी स्वतःहून पक्षाचा राजीनामा दिल्याने भाजपने या तिघांचा राजीनामा मंजूर केला आहे.
हिना गावीत यांची अक्कलकुवा मतदारसंघातून बंडखोरी –
डॉ. हिना गावीत ह्या मंत्री राजेंद्रकुमार गावीत यांच्या कन्या आहेत. लोकसभेच्या नंदुरबार लोकसभेच्या त्या दोन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर हिना गावित या आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत अक्कलकुवा मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे) वाट्याला गेल्यानंतर त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज (अपक्ष) दाखल केला आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे आमश्या पाडवी यांच्यासमोर त्यांचे मोठे आव्हान असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या ताज्या अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुप लिंक –
https://chat.whatsapp.com/Epf5BuIAHZd7rhVQGb55xB
एरंडोलमधून ए टी पाटील यांचे अपक्ष म्हणून आव्हान –
भाजपचे माजी खासदार ए.टी. पाटील यांनी जळगाव लोकसभेचे सलग दहा वर्ष प्रतिनिधित्व केले होते. 2009 आणि 2014 ला ते लोकसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून गेले होते. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापत उन्मेश पाटील यांना तिकीट देण्यात होते. असे असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि त्या लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या. दरम्यान, आता ए टी पाटील यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघातून भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत असून शिंदेच्या शिवसेनेचे अमोल पाटील तसेच शरद पवार गटाचे डॉ. सतीश पाटील अशी तिरंगी लढत याठिकाणी होणार आहे.
पाचोऱ्यातू अमोल शिंदे अपक्ष म्हणून पुन्हा रिंगणात –
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात अमोल शिंदे यांनी भाजपमधून बंडखोरी करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते अगदी कमी मताने पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, काही कालावधीनंतर त्यांना पुन्हा एकदा भाजप तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अमोल शिंदे यांनी भाजपमधून पुन्हा एकदा बंडखोरी करत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह वैशाली सुर्यवंशी तसेच दिलीप वाघ यांच्यासमोर त्यांचे मोठे आव्हान असणार आहे.