पुणे : आज रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला राज्यातील ५ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आदी नेतेही या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.
असा आहे कार्यक्रम –
पुण्यात बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजप प्रदेश कार्यकारणीचे अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर साडेअकरा वाजेच्या सुमारास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्षीय प्रस्ताव असेल. दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे हे अभिनंदनाचा ठराव मांडतील. यानंतर दुपारी 12 वाजता नितीन गडकरी, तर दुपारी अडीच वाजता देवेंद्र फडणवीस हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी 3 वाजता अमित शाहांच्या भाषणाने या अधिवेशनाचा समारोप होईल.
महायुतीच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे, यावर भाजपचा भर आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या काही चुका भाजपकडून झाल्या असतील, त्या आगामी काळात भाजपकडून होऊ नयेत, याप्रकारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि त्याप्रकारे आगामी विधानसभेची रणनिती ठरवली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रानुसार, कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचार आणि तयारीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका प्रतिनिधी, पदाधिकारी आदी सहभागी होणार आहेत. दरम्यान, आजच्या या बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.