ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 ऑक्टोबर : लासगाव येथे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज 30 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर पार पडले. जि.प.मराठी शाळेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पाडले. दरम्यान, आमदार पाटील यांनी स्वतः या रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यावेळी केक कापून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात माजी जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्यासह 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. उल्हास तासखेडकर, अनिल भोळे, दिक्षा कांबळे, रवींद्र जाधव, मंगेश ओतारी, आमीर शहा आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिर प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेनेचे किरण पाटील, डॉ. प्रदीप पाटील, विजय बापू पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच वहिद देशमुख, ग्रामसेवक अनिल पगारे, उपसरपंच, सदस्य तसेच माजी सरपंच-उपसरपंच आणि सदस्य, पोलीस पाटील पंजाबसिंग पाटील, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक अहिरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. उल्हास तासखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लासगावातील रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचे गटनिहाय वर्गीकरण करून रक्ताच्या सर्व तपासण्या केल्या जातील आणि त्यांना ब्लड बँकेत ठेवण्यात येईल. तसेच रक्तदात्याला प्रमाणपत्र तसेच गुलाबी कार्डचे वाटप करण्यात आले असून त्यास भविष्यात रक्ताची गरज भासल्यास ते मोफत दिले जाईल. अथवा त्याच्या नातेवाईकाला रक्ताची गरज भासल्यास त्यावर 300 रूपयांची सूट दिली जाईल. तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्तादात्याला 1 वर्षासाठी विमा लागू असेल.
हेही वाचा : आता ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाची माहिती सर्वांना कळणार; वेबसाइट नव्याने विकसित करण्याचे आदेश
 
			 
					





