ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. काही ठिकाणी कडक ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातारवरण असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना दुपारपासून जळगावसह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
पाचोऱ्यासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी –
हवामान विभागाने कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. असे असताना जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून आले. तसेच दुपारनंतर ढगांचा गडगडाटासह पावसाच्या वातावरणाची निर्मिती झाली. यानंतर पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.
उद्या ‘या’ भागात पावसाची शक्यता –
हवामान विभागाच्या अंदाजनुसार सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन तसेच मका यासारख्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत