मुंबई, 7 डिसेंबर : राज्याच्या महायुती सरकरमधील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज 9 डिसेंबरपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. यावेळी, इतर आमदारांसह पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले किशोर आप्पा पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली.
सलग तिसऱ्यांदा विजयी –
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांना सर्वाधिक 97 हजार 366 मते मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांना 58 हजार 677 तर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना 58 हजार 071 इतकी मते मिळाली. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांचा 38 हजार 689 मतांनी विजय झाला.
आमदार किशोर आप्पा पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघात किशोर आप्पा पाटील यांनी आमदार म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला.
मंत्रीपद मिळणार का? –
पाचोरा भडगाव मतदारसंघाला प्रदीर्घ काळापासून मंत्रीपद लाभले नसताना किशोर आप्पा पाटील हे सलग तीन वेळा निवडून आल्याने त्यांना मंत्रीपद मिळावे, अशी मतदारसंघात चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून मंदिरात महाआरती देखील करण्यात आली. असे असताना महायुतीच्या सरकारमध्ये किशोर आप्पांचा मंत्री म्हणून समावेश असणार का?, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
Vidhansabha Session Live : विधानसभा विशेष अधिवेशन 2024; नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी लाईव्ह