लातूर, 12 डिसेंबर : भारताचे माजी गहमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या 90 व्या वर्षी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. दरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
कोण होते शिवराज पाटील चाकूरकर?
शिवराज पाटील यांचा जन्म हा 12 ऑक्टोबर 1935 लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला होता. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. यानंतर १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले.
१९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
१९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. 2004 मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले. मात्र, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला. २०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. १९६३ मध्ये त्यांनी विजया पाटील यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहेत. त्यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहे.






