जळगाव, 18 सप्टेंबर : केळीचे घड डोक्यावर घेत अन् केळीची पाने अंगाला बांधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जळगावात अनोखे आंदोलन केले. नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मागण्या लिहिलेले केळीचे पान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवले.
नेमकी काय आहे बातमी –
सीएमव्ही आजारामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी, थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारने पूरग्रस्तांना सुद्धा तातडीने मदत करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केळीच्या पानावर लिहिल्या मागण्या –
सीएमव्ही आजारामुळे नुकसान झालेल्या केळीचे अंगाला पाने बांधून व डोक्यावर केळीचा घड ठेवत तसेच केळीचे खांब घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार निषेध नोंदविला. तर केळीच्या पानावर मागण्या लिहण्यात आल्या. ते केळीचे पान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.