रत्नागिरी, 17 फेब्रुवारी : माजी खासदार निलेश राणे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या सभेपूर्वी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली होती. दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आधी सिंधुदूर्गात जाऊन जाहीरसभा घेत राणे कुटुंबीयावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, या सभेला प्रत्युत्तर म्हणून नीलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, नीलेश राणे यांच्या सभेपूर्वी चिपळुणमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीत राणे समर्थक आणि भास्कर जाधवांचे समर्थक यांच्यामध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात पोलीस अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, ट्रकने दुचाकी नेली 12 किमी फरफटत, जामनेरच्या दोघांचा मृत्यू