जळगाव, 21 फेब्रुवारी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची परवानगी न घेता मेहरूण गावात 16 रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारी (19 फेब्रुवारी) गुन्हा चार जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान महाजन अशी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी 15 दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, तसे न करता मेहरूण गाव शिवारात 16 फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी गणेश भांडारकर यांना याबाबत माहिती झाली असता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मेहरूण गाव शिवारात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मला निमंत्रण असल्याने मी तेथे गेलो. आयोजकांचेही पहिलेच वर्ष असल्याने त्यांना पुरेशी माहिती नसेल. त्यांना पोलिसांनी माहिती द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
बैलगाडी शर्यतीस परवानगी आवश्यक –
जळगाव जिल्ह्यात विनापरवानगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू नये तसे होत असल्याचे अथवा झाल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शामकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे