मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होणार आहेत. यासाठी ते उद्या 19 जानेवारी दावोसच्या दौऱ्यावर निघणार आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. यानंतर आता आपल्या दावोस दौऱ्यात डेटा सेंटर्स, ऑटोमोबाइल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात सामंजस्य करार होणार आहेत.
मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार –
याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितले की, “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही अशी जागा आहे, जिथे जगातील सगळे बिजनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्र येतात. या ठिकाणी मोठया प्रमाणात नेटवर्किंग तर होतंच, विचारांचं आदान प्रदान देखील होते. मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट नेटवर्किंग होते, त्या दृष्टीने मी दावोसला चाललो आहे. अनेक महत्त्वपूर्ण बैठकी ठरलेल्या आहेत. अनेक बिझनेस लीडर आणि वर्ल्ड लीडरसोबत बैठकी ठरलेल्या आहेत.” तसेच तिथे चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते आणि त्या काळात औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले.
दरम्यान, यानंतर आता या दौऱ्यात फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे पी. अन्बलगन, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थपकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – बांगलादेशाच्या ‘या’ निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; नेमकी काय आहे बातमी?