मुंबई, 26 फेब्रुवारी : राज्यामध्ये 2015-16 ते 2019-20 या कालावधी दरम्यान, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा राज्य सरकारकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023 जाहीर करण्यात आला आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 मार्च 2023 ही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आमचे भागीदार व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांना केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
राज्य शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केलाय. राज्याच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग असावा, त्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवता याव्यात, प्रशासकीय प्रक्रियांना गती देता यावी, आणि नेहमीच्या ठराविक चौकटी पलीकडला विचार धोरणनिर्मितीमध्ये यावा, यासाठी आपले महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवित आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, 2015 ते 2019 या कालावधीत आम्ही मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविला होता. त्यावेळी या फेलोशिपला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. अनेक योजना, प्रकल्प यामध्ये फेलोंनी महत्त्वाचे योगदान दिले होते. मुख्यमंत्री वार रुमच्या माध्यमातून मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती देण्यामध्ये जसा या फेलोंचा सहभाग होता तसाच तो कोल्हापूर, सांगलीमधील पूराच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनातही होता.
शासनासोबत तरुण वयात काम करण्याची संधी…. #मुख्यमंत्रीफेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आमचे भागीदार व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तरुणांना आवाहन
✅अर्ज करण्याची अंतिम मुदत– २ मार्च २०२३
✅ अधिक माहिती– https://t.co/spmUGQszxe pic.twitter.com/RBr2mBCfHM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 26, 2023
महिन्याला मिळणार 75 हजार रुपये, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023 जाहीर, वाचा सविस्तर
महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलसोबतही फेलोंनी जसे काम केलं तसंच काम त्यांनी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतही केले. या फेलोशिपचा उपयोग जसा शासनाला होतोय तसाच तो फेलोंनाही होतो. शासनासारख्या मोठ्या यंत्रणेसोबत इतक्या तरुण वयात काम करण्याची संधी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. त्यांच्या ज्ञानात, कौशल्यामध्ये या अनुभवामुळे मोठी भर पडते. विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी त्यांना उपलब्ध होतात. अशा या महत्त्वाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. चला, पुढे या आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत आमचे भागीदार व्हा, असे आवाहन राज्यातील तरुणांना या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 2 मार्च 2023