नंदुरबार, 28 जानेवारी : हात पाय असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे हतबल झालेले अनेक जण तुम्ही पाहिले असतील. मात्र, ज्याला जन्मत:च हात नाही. अशा मुलाचा कल्पना तुम्ही कधी केलीये? नंदुरबार जिल्ह्यातील गणेश अवघ्या 8 वर्षांचा आहे. दोन्ही हाताने तो व्यंग, त्यात त्याच्या घरची परिस्थिती ही हालाकीची आहे. इतकंच नव्हे तर त्याची आई घर सोडून निघून गेली आहे. मात्र, अशा या विपरीत परिस्थितीतही हा 8 वर्षांचा चिमुरडा गणेश एका लढवय्याप्रमाणे आयुष्य लढत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद या गावातल्या गणेश अनिल माळी या चिमुरड्याची ही संघर्षमय कहाणी आहे. गणेश हा दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मात्र, त्याला जन्मापासून दोन्ही हात नाही आहेत. तरीसुद्धा हा चिमुरडा जगण्यासोबत लढत आहे. हात नसूनही गणेशने आपल्या अंपगत्वावर मात करत शिकण्याची उमेद दाखवली आहे.
तो लहान असतानाच त्याची आई घर सोडून निघून गेली होती. यानंतर गणेशचे वडील अनिल माळी यांनी त्याचे पालनपोषण केले. सकाळी 4 वाजेपासून उठून अनिल माळी हे गणेशच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतात. हात नसतानासुद्धा गणेश हा अवघ्या आठव्या वर्षी पायाने अक्षर गिरवतो. तो जेवण कसे करत असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र, जेवतानाही त्याचे पायच हाताचे काम करतात.
त्याच्या वर्गातील मित्रही त्याला अभ्यासात सहकार्य करतात. त्याच्या जिद्दीमुळे त्याच्या शिक्षणाला त्याचे अपंगत्व थांबवु शकलेले नाही. पण त्याच्या घराच्या गरीबीमुळे तो आणखी किती दिवस हे सहन करणार किंवा तग धरणार, असा प्रश्न त्याच्या कुटुंबासह त्याच्या शुभचिंतकांनाही सतावत आहे.
त्याचे वडील अनिल माळी हे मोल मजुरी करतात आणि कसाबसा कुटुंबाचा गुजारा करतात. त्याच्या आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रिम अवयवांसाठी आणि त्यांच्या जीवनाच्या लढाईसाठी मदत मिळावी, अशी अपेक्षा गणेशच्या जवळच्या मंडळींनी केली आहे. सरकारने त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांचा बंदोबस्त करुन दिला तसेच त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले तर गणेशचा हा लढा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
गणेशच्या या अवस्थेनंतर त्याच्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. जर तुम्हाला गणेशला आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करुन त्याला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे त्याला आर्थिक मदतीचा हात होऊ शकता.
गणेशचे वडील अनिल माळी यांचा मोबाईल नंबर – 9529930880
आर्थिक मदतीसाठी फोन पे आणि पेटीएम नंबर – 7498970392
महत्त्वाची सूचना – गणेशला आर्थिक मदत करण्यापूर्वी तुम्ही या नंबरवर संपर्क करुन पडताळणी करुन घ्यावी.