मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 17 जानेवारी : गांजी तस्करीचे प्रमाण वाढले असताना चोपडा शहर पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या दोन टोळ्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून 15 व 16 जानेवारी रोजी पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.
पहिल्या कारवाईत 400 किलो गांजा जप्त –
चोपडा शहर पोलीस ठाणे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करून चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे दोन मोटार सायकल स्वारांना पकडून त्यांच्याकडून 400 किलो 700 ग्रॅम गांजा हस्तगत केला. त्यांच्याविरोधात चोपडा शहर पोलिसांत एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्हाचा तपास सपोनि एकनाथ भिसे हे करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत 31 किलो गांजा जप्त; 5 जणांना अटक –
चोपडा शहरातून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक चालु असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना प्राप्त झाली होती. यानंतर तपासासाठी पोलिसांची विविध पथके तयार करून शिरपूर ते चोपडा रोडवर सापळा लावत एका इकोकारमधून भरधाव वेगाने गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडील गाडीमध्ये दोन गोण्यांमध्ये भरलेल्य 31 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध चोपडा शहर पोलिसांत एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे हे करत आहेत.
या कारवाईत चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोउनि जितेंद्र वाल्टे, सफौ जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ हेमंत कोळी, पोहेकॉ महेंद्र साळुंखे, पोकॉ महेंद्र पाटील, पोकॉ रविंद्र मेढे, पोकॉ प्रकाश मथुरे, पोकॉ प्रमोद पवार, पोकॉ समा तडवी, पोकॉ अक्षय सुर्यवंशी, पोकॉ शाम धनगर, पोकॉ पंकज ठाकूर, पोकॉ जगन्नाथ पाटील, पोकॉ राजेंद्र कोळी, पोकॉ रजनीकाम भास्कर यांचा समावेश आहे.
दरम्यान, सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
हेही वाचा : Video : मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर बॉडीगार्ड व पोलिसांत राडा; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ…