मुंबई, 8 मार्च : लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केल्याने आता लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिलांची संख्या असेल. यामुळे 2029 पर्यंत आमचं राज्य त्यानंतर राज्यात आणि देशात ‘महिला राज्य’ तयार होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा समारोप व कन्या रत्नांचा सन्मान या करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 हा केवळ स्त्री शक्तीच्या बळावर संपन्न होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आदी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महिलांवर हिंसाचार थांबविण्यासाठी आपल्या व्यवस्थेत महत्वाची गोष्ट करण्याची गरज आहे. खरंतर, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात कायदे आहेत. अजून कडक कायदे करू. पण केवळ कायद्याने हे होणार नाही. समाजात स्त्रियांना मान देणं हे आपलं कर्तव्य आहे तसेच स्त्री आणि पुरूषांमध्ये भेद नाही, असे जोपर्यंत मुलांना आपण शिकवत नाही, तोपर्यंत या प्रवृत्ती कमी होणार नाहीत, यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक पिढीत स्त्री सन्मानाची भावना कशी निर्माण होईल, यासाठी काम करावे लागेल.
स्त्री आणि पुरूषांची शारिरीक रचना जरी वेगळी असली तरी त्या दोघांचे व्यक्तिमत्व तसेच वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांच्यात एक समानता आहे. असे जोपर्यंत आपण समाजात प्रतिपादित करणार नाही. तोपर्यंत समाजामध्ये महिलांप्रती जी हिंसा आपल्याला पाहायला मिळते ती हिंसा देखील कमी होणार नाही. दरम्यान, यासाठी आवश्यक असलेली मूल्ये रूजविण्याचे काम आपण सर्व करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जगातील तेच देश विकसित होऊ शकले, ज्या देशातील अर्थव्यवस्थेतील 50 टक्के हिस्सेदारी महिलांकडे आहे. त्यामुळे जोपर्यंत या महिलांना आपण अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणत नाही. जोपर्यंत त्यांना मानव संसाधन म्हणून विकसित करू शकत नाहीत, तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बेटी बचाव बेटी पढाओ अभियानपासून झालेली सुरूवात ही आता लखपती दिदीपर्यंत पोहचली आहे.
समाजात ज्यापद्धीतीने स्त्री भ्रूण हत्याचे प्रमाण वाढल होते. आज ज्याठिकाणी लिंग विषमता झाली त्या जिल्ह्यात मुलांना लग्नांकरिता मुली उपलब्ध नाहीत, त्यावेळेस कशापद्धतीचा मुर्खपणा करण्यात आलाय. पण मला अतिशय आनंद आहे की, महाराष्ट्रात 2015 साली बेटी बचाव बेटी पढाओ अभियान सुरू झाल्यानंतर आज लिंग गुणोत्तर सुधारले. अनेक बदल त्यामुळे दिसून येत आहेत. मी देखील एका मुलीचा बाप आहे. त्यामुळे हे निश्चित सांगू शकतो की, मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या आई-बापाची काळजी अधिक योग्य पद्धतीने घेतात.