मुंबई, 5 नोव्हेंबर : राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वॉर रूम’ बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर संताप व्यक्त केला. पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, अशा इशाराही त्यांनी कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांना यावेळी दिला.
प्रकल्पासाठी ठराविक ‘डेडलाईन’ ठरवा –
राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांचा सविस्तर आढावा बैठकीत प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती, निधीचा वापर आणि उर्वरित कामांचा तपशील सादर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वाच्या सूचना करत प्रत्येक प्रकल्पासाठी ठराविक ‘डेडलाईन’ ठरवा आणि त्या मुदतीतच काम पूर्ण करा,” अशा शब्दात अधिकारी-कंत्राटदारांना सुनावलं.
प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यात घ्यावा –
राज्यातील सर्व विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण व्हावेत आणि यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला. हे प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत पूर्ण व्हायला पाहिजे, अशा प्रकारे नियोजन करावे. तसेच त्यांच्या प्रगतीचा आढावा दर 3 महिन्यात घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.
अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास हा अत्यावश्यक प्रकल्प असल्याचे नमूद करत या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विभाग, अधिकारी आणि कंत्राटदारांनी समन्वय साधून सर्व अडथळे दूर करावेत, नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यावर भर द्यावा, तसेच प्रकल्प निश्चित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.






