मुंबई, 15 जुलै : विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केलीय. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वारकरी महामंडळाची स्थापना –
महाराष्ट्र सरकारकडून अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. राज्यात वारकरी मंडळ स्थापना करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री-अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून राज्य सरकारने अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. वारकरी महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटी इतके असणार आहे. दरम्यान, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिले जाणार आहे.
वारकरी पेन्शन योजना –
आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. तसेच वारकरी महामंडळाच्या माध्यमातून परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर काल 14 जुलै रोजी राज्य सरकारकडून यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार