चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 29 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सरकारने युवक-युवती, महिला तसेच शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवत मोठ्या प्रमाणात घोषणा केल्यानंतर विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? –
सरकार या योजनांची पुर्तता करण्यासाठी कुठुन देणार एवढा पैसा असा प्रश्न काल विरोधकांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे सरकार थेट लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे पैसे देणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जीआर एकनाथ शिंदेंनी यावेळी सभागृहात दाखवला. तसेच “आमचे दादा बोलले त्यानुसार जीआर काढला. दादा का वादा पक्का रहता है”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘हा एकनाथ शिंदे कधी खोटं बोललेला नाही’ –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना फसवल्याची ओरड झाली. पण आत्तापर्यंतच्या इतिहासात अतीवृष्टी, अवकाळी, गारपिटीला 15 हजार कोटी रुपये कधीच दिले नव्हते. आम्ही एनडीआरएफच्या नियमांच्या बाहेर जाऊन ही रक्कम डीबीटीने दिलीय. एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही पैसे दिले असून हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटे बोलला नाही अन् कधी खोटे बोलणार नाही, असेही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर टीका करताना ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ असा टोला लगावला होता. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार प्रहार केला. जयंत पाटील म्हणाले की लोकसभा में चादर फट गई. अरे कुणाची चादर फाटली? मोदी तर पंतप्रधान झाले. फाटली कुणाची? हरलेले लोक पेढे वाटायला लागले येड्यासारखे आणि तुम्ही कशाला पेढे वाटताय? विरोधी पक्षनेतेपद मिळाले म्हणून? असा प्रश्न करत मुख्यमंत्री शिंदे यांनी विजयराव, तुम्ही त्यांना सांगा तरी. जंग जंग पछाडल्यानंतरही तुम्ही मोदींना हटवू शकले नाहीत”, असा टोला लगावला.
हेही वाचा : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, चार प्रवासी गंभीर जखमी