चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर, 27 एप्रिल : कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या आज प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेत बोलताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ज्यावेळी काँग्रेससोबत जावे लागेल, त्यावेळी माझे दुकान बंद करेन. पण, त्याच ठाकरेंचा मुलगा आज पंजाला मतदान करणार आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवली पाहिजे होती. उबाठाची आता पूर्ण काँग्रेस झाली असून. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा गोष्टीचा ते अभिमान बाळगत आहेत. असे पाऊल उचलल्याने बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील.
हिंदूह्रदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली –
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, 26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये ते गेले होते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच हिंदूह्रदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे आणि आता उबाठाची एक काँग्रेस झालेली असल्याचा निशाणा त्यांनी लगावला.
देशाचा कणखर आणि कतृत्ववान पंतप्रधान पाहिजे –
मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना सांगितले की, देशात गरमी झाली म्हणून परदेशात पळणारा नेता आपल्याला पाहिजे की, दररोज 24 तास, 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान आपल्याला पाहिजे. देशाचा कणखर आणि कतृत्ववान पंतप्रधान आपल्याचा निवडायचा आहे, असे आवाहन शिंदे यांनी केले. परदेशात देशाची बदनामी करणारा नको, तर परदेशात देशाचा सन्मान वाढवणारा पंतप्रधान आपल्याला पाहिजे, ही आपली मागणी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : उज्ज्वल निकम यांनी राजकारणातील ‘एन्ट्रीवर’ दोन वर्षांपुर्वीच केले होते भाष्य, नेमकं काय म्हणाले होते?