चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 27 एप्रिल : भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते लढणार असून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याविरोधात त्यांची जोरदार लढत होणार आहे. मात्र, राजकारणातील प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांनी मागील दोन वर्षांपुर्वी भाष्य केले होते.
काय म्हणाले होते उज्ज्वल निकम? –
जेष्ठ वकील यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सांगितले होते की, राजकारणात येणाचा प्रश्न जर-तरचा आहे. माणसाने कितीही विचार केला तरी त्याला ‘नसीब से ज्यादा आणि समय से पहले कुछ नहीं मिलता’ यामुळे आपल्या प्रारब्धात काय आहे?, हे आपल्याला माहित नसते. परंतु, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे चिंतनाने काम केले तर त्या कामात आपण यशस्वी होऊ शकतो.
त्यांनी त्यावेळी पुढे सांगितल्याप्रमाणे, मी एवढेच म्हणेन की, भविष्यात काय होते ते पाहूयात. मी स्वतःहून कुठलेही प्रयत्न करणार नाही. परंतु कोणी संधी दिली, तर चांगल्या प्रकारची संधी असेल तर त्याचा निश्चितच विचार करेन. मध्यंतरीच्या काळात मला राजकीय पक्षांकडून लोकसभेकरिता विचारणा झाली होती. परंतु, मी त्यावेळी विचार केलेला नव्हता. मी त्यावेळी नकार दिला होता.
राजकारण हे वाईट नाही –
राजकारण हे वाईट नसून राजकारणदेखील चांगले आहे. यासोबत मतदारदेखील सुधारले गेले पाहिजेत. आम्ही फक्त राजकारण्यांना दोष देतो, मतदारांना देत नाही. मतदाराने जर चांगल्या लोकांना निवडून दिले, कोणत्याही आमिषाला, प्रलोबधनाला बळी नाही पडले तर राजकारण्यांना देखील तसे करण्याची गरज भासणार नाही. म्हणून एखादे क्षेत्र चांगले आणि एखादे क्षेत्र वाईट, असे मानण्याचे कारण नाही. प्रत्येक क्षेत्र चांगले असते. मात्र, ते क्षेत्र गढूळ होते की स्वच्छ होते हे त्या क्षेत्रातील काम करणाऱ्यांवर अवलंबून असते, असेही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ठ केले होते.
कोण आहेत उज्ज्वल निकम? –
उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 रोजी झाला असून त्यांनी जळगावातील मनियार कॉलेजमधून वकीलीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी त्यांच्या 30 वर्षांहून अधिक जुन्या कारकिर्दीत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध उच्च-प्रोफाइल खटले लढवले आहेत. यामध्ये 1993 चे बॉम्बस्फोट प्रकरण, प्रसिद्ध भक्तिगीते गायक गुलशन कुमार खून प्रकरण, भाजप नेते प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण यांचा समावेश आहे.
उज्ज्वल निकम यांना का मिळाली उमेदवारी? –
1993 चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. यातून त्यांनी जनमाणसांत चांगली प्रतिमा आहे. तसेच त्यांचा कायद्याचा गाढा अभ्यास असून याचा सरकार चालवत असताना प्रत्यक्ष फायदा होईल, या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात