चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 5 जुलै : टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचे काल मुंबईत लाखो क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. यानंतर आज विधिमंडळात महाराष्ट्र शासनाच्यावतीने विश्वविजेत्या कर्णधार रोहित शर्मासह महाराष्ट्रातील सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैयस्वाल या चौघ खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टीम इंडियातील खेळाडूंचे अभिनंदन करत जोरदार भाषण केले.
View this post on Instagram
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम टीम इंडियातील खेळाडूंचे अभिनंदन केले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सुर्यकुमार यादवच्या कॅचवर बोलताना सांगितले की, सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसे कोणी विसरणार नाही, तसेच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कुणी विसरु शकणार नाही. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही देखील बॅटींग करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच सूर्याचा तो कॅच आठवला की डेव्हिड मिलर हा देखील रात्री झोपेत दचकून उठत असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अरबी समुद्राच्या बाजुला मुंबईकरांचा महासागर –
आपण 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वर्ल्डकप जिंकला. त्यातच, पाकिस्तानला हरवले तेव्हाच अर्धा वर्ल्डकप आपण जिंकला होता, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, काल आपण जो जल्लोष पाहिला की, अरबी समुद्राच्या बाजुला मुंबईकरांचा महासागर उसळला होता. ते पाहून आम्हालाही धडकी भरली होती. कारण, एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, गर्दी पाहता आम्ही पोलिस आयुक्तांना फोन करुन वाहतुकीचे नियोजन आणि सर्वकाही सुरळीत होण्यासाठी सूचना केल्या. कालची गर्दी व्यवस्थितपणे हातळल्यामुळे मी मुंबईच्या पोलिसांचे देखील अभिनंदन करतो.
11 कोटी रुपये प्रोत्साहनपर बक्षीस –
भारतीय संघात 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा विशेष अभिमान असून संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, हेही अभिमानाची बाब आहे. दरम्यान, रोहित शर्मासह टीम इंडियाचे अभिनंदन करत राज्य सरकारच्यावतीने भारतीय संघाला 11 कोटी रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
हेही वाचा : “सुर्याने हा कॅच घेतला नसता तर…..” विश्वविजेत्या कर्णधार रोहित शर्माने थेट सांगूनच टाकलं