ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा/जळगाव, 7 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी लम्पी आजाराचा संसर्ग वाढल्यामुळे जनवारांच्या आठवडे बाजारावर बंदी घातली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जनावरांच्या बाजारावर घातलेली बंदी उठवण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.
जनावरांच्या आठवडे बाजारवरची बंदी उठली –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व धरणगाव या तालुक्यात लम्पी आजाराचा संसर्ग वाढल्याने या तालुक्यांतील जनावरांच्या आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात लम्पी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुरांचा बाजार भरविणे तसेत गुरांची वाहतूक करणे याकरिता ज्या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून 28 दिवस पूर्ण झालेले असण्याच्या अटीच्या शर्तीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मान्यता दिली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन –
रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गुरांना विक्रमी वेळेत लसीकरण केल्याबद्दल पशुवैद्यकीय डॉक्टर आणि पशुधन पर्यवेक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. आजारी गुरांची काळजी घेतल्याबद्दल व त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल सर्व पशुपालकांचे आभार मानत तसेच सर्व प्राण्यांशी प्रेम, काळजी आणि आपुलकीने वागण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
आमदार किशोर पाटलांनी घेतली होती जिल्हाधिकाऱ्यांची भेट –
आमदार किशोर पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत जनावरांच्या आठवडे बाजारावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली होती. तसेच आमदार किशोर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत यासंदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जनावरांच्या आठवडे बाजारावरील बंदी उठवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.