चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 25 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील वीजेबाबतच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी सध्यास्थितीत काम सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात सोलर प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाणार आहे. आणि हे प्रकल्प वेळेत जर पुर्ण झाले तर वीजनिर्मितीत जळगाव जिल्हा इतिहास घडवू शकतो, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन (एमरजन्सी लोडशेडिंग) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’सोबत विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी वीजेबाबतच्या अत्यंत महत्वाच्या विषयांवर भाष्य केले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना म्हणाले की, एमरजन्सी लोडशेडिंगला दोन ते तीन कारण आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू होता. यामुळे तापमान कमी असल्यामुळे विद्युत उपकरणांचा वापर कमी झाला होता. विजेचा औद्योगिक भार देखील कमी झाला होता. मात्र, आता तापमान वाढल्याने अचानकपणे विद्युतचा वापराचा भार वाढला. आणि एमरजन्सी लोडशेडिंगची समस्या जाणवू लागली. विद्युत वितरणाची कंपनी अर्थात एसएससीडीएलने यावर उपाययोजना सुरू केल्या ही समस्या सोडविण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न देखील करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती प्राप्त झालीय.
सहा सबस्टेशनसाठी 150 कोटींचा प्रस्ताव –
आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील विजेबाबतच्या मुलभूत आणि दीर्घकालीन समस्या सोडविण्यासाठी महापारेषाणकडून सहा सबस्टेशन करायची गरज आहे. भारत सरकारच्या आरडीएसएसएस योजने अंतर्गत त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वार्षिक कृती आराखड्यात 150 कोटी रूपयांचा प्रस्ताव यामध्ये हे सहा सबस्टेशन तयार करण्यात येणार आहे. यासाठी लागणारे भूसंपादन हा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी खासदार स्मिता वाघ तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यातर्फे सातत्याने पाठपुरावा केला जातोय. तर दुसरीकडे वीज निर्मिती अर्थात उत्पादनाची देखील तितकीच गरज आहे.
वीजेबाबतची समस्या सुटण्यास मदत –
वीजनिर्मितीसाठी असलेले दीपनगर येथील विद्युत प्रकल्पाला कार्यान्वियत करणे गरजेचे आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 60 दिवसाचे काम शिल्लक आहे. याकरिता महाजेनको, भेल यासारख्या कंपन्या प्रयत्न करत आहेत. पी. अन्बलगन यांच्यासारखे मान्यवर यासाठी पाठपुरावा करत आहेत. म्हणून काही दिवसांत हे काम देखील सुरू होईल. तसेच या दोघं बाबी पुर्ण झाल्यात तर बऱ्यापैकी वीजेबाबतची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.
सोलर प्रकल्पाद्वारे 1 हजार मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जाणार –
आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सोलर प्रकल्पाद्वारे 1 हजार मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील पहिला सौर प्रकल्प देखील कार्यान्वयित झालेला आहे. जिल्ह्यात वीजेची मागणी 900 मेगाव्हॅट इतकी आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या सोलर प्लँटच्या माध्यमातून भविष्यात 1000 मेगाव्हॅट वीजनिर्मीतीची क्षमता प्राप्त झाली तर शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच 900 मेगाव्हॅट वीजेचा भार कमी करण्यास मदत होणार आहे.
वीज निर्मिती-वितरण करण्यात मिळणार मोठं यश –
तसेच दीपनगर येथील विद्युत प्रकल्पात 660 मेगाव्हॅट इतकी वीज आणू शकतो. यामुळे सुमारे 1400 मेगाव्हॅटपेक्षा जास्त वीज उत्पादन जळगाव जिल्ह्यात केले जाऊ शकते आणि वीज वितरणाच्या प्रक्रियेत देखील सुधारणात होतील. तसेच सध्यास्थितीतील वीजेबाबतच्या समस्येंबाबतच्या तुलनेत येणाऱ्या दोन वर्षांत वीज निर्मिती आणि त्याचे वितरण करण्यात जिल्हा प्रशासनाला मोठं यश मिळेल, असे आयुष प्रसाद म्हणाले. दरम्यान, कृषी फीडरला वेगळं करण्यासाठी 110 किमीची नवीन लाईन तयार करण्यात येत असल्याची माहितीही प्रसाद यांनी दिली.
जळगाव जिल्हा इतिहास घडवू शकतो –
एमरजन्सी लोडशेडिंग तेव्हाच होते, ज्यावेळी फॉल्ट्स किवा वीजेबाबतच्या मागणीत अचानक बदल होतात. आणि सध्यास्थितीत सुरू असलेली एमरजन्सी लोडशेडिंग ही मागणीत अचानक झालेल्या बदलामुळे सुरू झालीय. म्हणून आता प्लॅन लोडशेडिंग करू शकणार नाही. पुढील काही दिवस पावसाचे आहे. यामुळे वीजेचा भार पुन्हा एकदा कमी होणार आहे. पण याचे व्यवस्थापन पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे केले जाते. ही लोडशेडिंग कधी-कधी होते. परंतु, वीजेबाबतचा मुलभूत आणि दीर्घकालीन जो मुद्दा आहे. त्याला मिटविण्यासाठी सोलर प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात काम केले जात असून प्रकल्प पुर्णत्वास येण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य केले पाहिजे. आणि हे प्रकल्प वेळेत जर पुर्ण झाले तर वीजनिर्मिती व वितरणात जळगाव जिल्हा इतिहास घडवू शकतो, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन –
एमरजन्सी लोडशेडिंगच्या समस्येवरून नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना आयुष प्रसाद म्हणाले की, नागरिकांनी कारण नसताना विजेचा वापर कमी करावा. हर घर सुर्य घर योजनेचा वापर करावा. शेतकऱ्यांनी कुसुम योजनेंतर्गत सोलर पंपची मागणी करावी. सोलरचा वापर जास्तीत केला पाहिजे. वीजेअभावी मुलांच्या शिक्षणाला धोका होऊ नये, यासाठी घरात छोटी-छोटी इन्व्हेटर लावली पाहिजे. दरम्यान, नागरिकांचा संताप योग्य असून वीजेबाबतची समस्या मिटवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. आणि येणाऱ्या दोन वर्षात वीजेबाबतच्या समस्यांचा मागील अनुशेष भरून काढला जाणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी म्हटलंय.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत