नवी दिल्ली, 26 डिसेंबर : जागतिक किर्तीचे शिल्पकार, महाराष्ट्र भूषण डॉ. राम वनजी सुतार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा उद्या दि. २७ डिसेंबर रोजी भीम ऑडिटोरियम, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ, नवी दिल्ली येथे दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान होणार आहे. डॉ. सुतार यांचे गेल्या आठवड्यात १८ डिसेंबर रोजी निधन झाले होते.
डॉ. राम सुतार यांनी सात दशकांहून अधिक कारकीर्दीत शेकडो पुतळ्यांची निर्मिती केली. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची शिल्पे त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या रचना भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे अमर प्रतीक बनल्या आहेत. या सभेस कुटुंबीय, चाहते आणि कला प्रेमी उपस्थित राहणार आहेत, असे अनिल राम सुतार यांनी कळविले आहे.
गेल्या आठवड्यात १८ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी देश-विदेशात साकारलेल्या 200 हून अधिक शिल्पांमुळे ते कलाजगतात अजरामर झाले आहेत. दिल्लीतील संसद भवनाच्या प्रांगणात उभारलेली शिल्पे ही त्यांच्या कलाकृतींची साक्ष देतात. राम सुतार यांना पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन स्वतः त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गाऊन उपस्थितांना भावूक केले होते.
हेही वाचा : Jalgaon News : जळगावात महाराष्ट्र होमगार्डचा 79 वा स्थापना दिन सप्ताह उत्साहात साजरा






