मुंबई, 14 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विषयाची मोठी चर्चा सुरू होती, त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर केला आणि त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ –
हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ते दोन वेळा बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. तसेच एकदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत. त्यांच्या पत्नी या शाळेत शिक्षिका आहेत. यासोबतच सपकाळ यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. राज्याबाहेरच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने त्यांचा अत्यंत विश्वासू माणसाची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ –
“बुथवर चिठ्ठ्या वाटणारा एक कार्यकर्ता पुढे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, आमदार होतो. राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते आणि आता प्रदेशाध्यक्ष पदासारखा सन्मान केला जात असेल तर हा भारावून जाण्यासारखा क्षण आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अत्यंत सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला हा सन्मान दिला जात असेल तर हे माझं सौभाग्य आहे”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी ही अत्यंत निराशाजनक राहिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे. याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे.