जळगाव, 4 ऑक्टोबर : आत्महत्येसाठी संशयास्पद व्यक्ती रेल्वे ट्रॅकललगतच्या परिसरात वावरतांना आढळून आल्यास ही घटना रोखण्यासाठी तात्काळ प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जळगावातील हरी विठ्ठल नगर येथील रेल्वे ट्रॅक परिसरात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
रेल्वे ट्रॅकची पाहणी –
मागील काही दिवसांपासून हरि विठ्ठल नगर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांमध्ये या विषयाबाबत जनजागृती व्हावी, आत्महत्यांपासून लोकांना परावृत्त करावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हरी विठ्ठल नगर परिसरातील रेल्वेट्रॅकच्या ठिकाणाची आज पाहणी केली. परिसरातील नागरिकांशी संवाद साधून आत्महत्यांच्या घटनांबद्दल चर्चा केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन –
आत्महत्या करणेसाठी संशयास्पद व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्यास घटना रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. नागरी सुविधांबद्दल चर्चा केली, त्यांची मते जाणून घेतली. अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.
समूपदेशनासाठी टोल फ्री क्रमांक –
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेत बदल व्हावा, आत्महत्येचा, नैराश्याचा विचार डोक्यात येवू नये, आत्महत्या घडू नये यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा रूग्णालयाच्या वतीने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत टेलिमानस टोल फ्री 14416 हेल्पलाईन क्रमांकाची जनजागृती करण्यात आली. या क्रमांकावर कोणीही संपर्क साधल्यास समूपदेशन केले जाणार आहे. या टोल फ्री क्रमांकाचे लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकलगत खाबांवर बोर्ड लावण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील उपस्थित होते.