ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 जून : पाचोरा शहरातील बीएसएफ जवान चेतन हजारे यांना मिझोरम राज्यात कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. दरम्यान, वीर जवान चेतन हजारे यांचे पार्थिव आज सकाळी शहरात आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिवाराच्या भावना अनावरण झाल्या होत्या.
जवानास अखेरचा निरोप –
वीर जवान चेतन हजारे यांचे पार्थिव आज सकाळी पाचोरा शहरात दाखल झाले. यानंतर पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, भाजपचे अमोल शिंदे, डीवायएसी धनंजय वेरूळे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह मान्यवरांनी वीर जवानाचे अंत्यदर्शन घेत पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली. यानंतर वीर जवान चेतन हजारे यांना अखेरचा निरोप देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारावेळी परिसरातील लोक मोठ्या संख्येने शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, शहीद जवान चेतन हजारे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राष्ट्रध्वज जवानाच्या आईकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.
मिझोरम राज्यात होती पोस्टिंग –
पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागातील रहिवासी असलेले चेतन हजारे (वय, 29 वर्ष) हे विवाहित तरुण मिझोराम येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना 15 जून शनिवार रोजी रात्री 10 वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे 10 वर्ष त्याने देशसेवा बजावली. दरम्यान, त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
हेही वाचा : तिघांनी केला मानसिक छळ, तरूणाने गळफास घेत केली आत्महत्या, चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना