ईसा तडवी, प्रतिनिधी –
पाचोरा, 12 सप्टेंबर : नारपार – गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी राज्यसरकार ८ हजार कोटी खर्च करणार आहे. यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. गिरणा खोऱ्यातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. निम्न पाडळसे प्रकल्पाच्या कामास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. ते पाचोऱ्यातील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार –
अजित पवार म्हणाले की, आम्ही कुठेही गेलो तर विकासचं बोलतो मात्र काही जण येतात. बेताल वक्तव्य करतात. मला टीका करता येत नाही का. मी पण वाभाडे बाहेर काढू शकतो पण यातून प्रश्न सुटणार नाहीत, असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर लगावला. टीका करून रोजगार मिळणार नाही. काहीजण फक्त नौटंकी, नाटकीपणा करतात. पण यातून महाराष्ट्राचे भले होणार नाही, असेही ते म्हणाले.
शासन आपल्या दारी –
नागरिकांचे प्रश्न जागेवर सुटावेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात आहे. प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये दुवा साधणारा हा उपक्रम आहे. शासन आपले आहे ही भावना जनतेत निर्माण करण्याचे काम केले जात आहे . महाराष्ट्रातील सर्वाधिक ठिंबक सिंचन वापर करणारा जळगाव जिल्हा आहे.
निधी कमी पडू देणार नाही –
नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा केळी व कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात केळी व कापूस प्रक्रिया उद्योग आणण्याचा शासन प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही.
शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय –
राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने रस्त्यांची कामे करणे सहज शक्य झाले आहे. केळी पिकांचा समावेश मनरेगा योजनेत समाविष्ट करण्याचा तसेच जळगाव येथे केळी विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.