मुंबई, 13 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी कूपर रुग्णालयात भेट घेतली. या हल्ल्याचा निषेध करताना अजित पवार म्हणाले की, “पोलीस या हत्येचा तपास करत आहेत, दोन लोकांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे आणि पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांच्या टीम शोध घेत आहेत.”
आम्ही झिशान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत –
सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, बाबा आता आमच्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. या कठीण काळात आम्ही झिशान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे पवार म्हणाले. दरम्यान, शवविच्छेदनानंतर सिद्दीकी यांचा मृतदेह त्यांच्या घरी नेऊन जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली हत्येची जबाबदारी –
झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे, असे बाबा सिद्दिकी यांचे नाव घेऊन सांगितले आहे. दरम्यान, दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीत पोस्टमध्ये केला आहे.
हेही वाचा : Breaking : बाबा सिद्दिकींच्या हत्येची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी